डायलिसिसच्या रुग्णांनी आहार कसा घ्यावा?

डायलिसिसच्या रुग्णांनी आहार कसा घ्यावा?

डायलिसिस सुरू झाल्यानंतर अनेक रुग्णांचा पहिला प्रश्न असतो –
"डॉक्टर, आता नेमकं काय खायचं आणि काय टाळायचं?"
या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक रुग्णासाठी सारखे नसते.
रक्तातील पोटॅशियम, फॉस्फरस, हिमोग्लोबिन, लघवीचे प्रमाण, मधुमेह आणि इतर आजार यानुसार आहारात बदल करावे लागतात. तरीही काही सर्वसाधारण नियम बहुतेक डायलिसिस रुग्णांसाठी उपयुक्त असतात.
१. पुरेसे प्रथिने (Protein) घ्या
डायलिसिसदरम्यान शरीरातील काही प्रमाणात प्रथिने कमी होतात. त्यामुळे डायलिसिसच्या रुग्णांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक प्रथिनांची गरज असते.
शाकाहारी रुग्णांसाठी:
- पनीर (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)
- सोया उत्पादने
- मूग डाळ (मर्यादित प्रमाणात)
- चणा डाळ (मर्यादित प्रमाणात)
मांसाहारी रुग्णांसाठी:
- अंड्याचा पांढरा भाग
- मासे
- चिकन
प्रथिनांची गरज प्रत्येक रुग्णामध्ये वेगळी असते. आपल्या नेफ्रॉलॉजिस्ट किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
२. मीठ कमी ठेवा
जास्त मीठामुळे शरीरात पाणी साचते, रक्तदाब वाढतो आणि श्वास लागण्याचा त्रास होऊ शकतो.
टाळा:
- पापड
- लोणचे
- वेफर्स
- नमकीन
- तयार सूप
- जास्त मीठ असलेले पदार्थ
३. पाणी किती प्यावे?

हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो.
जर लघवी फारच कमी होत असेल किंवा बंद झाली असेल, तर पाणी पिण्याचे प्रमाण 600-800ml मर्यादित ठेवावे लागते.
सामान्यतः दिवसातील लघवीचे प्रमाण + सुमारे ५०० मि.ली. एवढे द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हा नियम प्रत्येक रुग्णासाठी सारखा नसतो. आपल्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
४. पोटॅशियमवर लक्ष ठेवा
रक्तातील पोटॅशियम वाढल्यास हृदयाच्या ठोक्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पोटॅशियम जास्त असणारी फळे व पदार्थ:
- केळी
- संत्री
- मोसंबी
- नारळपाणी
- सुकामेवा
- टोमॅटो (जास्त प्रमाणात)
- बटाटा (विशेष काळजी)
भाज्या चिरून पाण्यात भिजवून नंतर उकळल्यास काही प्रमाणात पोटॅशियम कमी होऊ शकते.
५. फॉस्फरस कमी ठेवा
फॉस्फरस वाढल्यास हाडे कमकुवत होतात आणि अंगाला खाज येऊ शकते.
जास्त फॉस्फरस असणारे पदार्थ:
- शीतपेये (कोला)
- प्रक्रिया केलेले अन्न
- चॉकलेट
- काही प्रकारचे चीज
- सुकामेवा
डॉक्टरांनी दिलेली फॉस्फेट बाइंडर औषधे :::जेवणासोबत::: नियमित घ्या.
६. वजनावर लक्ष ठेवा

दोन डायलिसिसच्या दरम्यान वजन २–३ किलोपेक्षा जास्त वाढू नये. जास्त वजन वाढल्यास पुढील डायलिसिसमध्ये अतिरिक्त पाणी काढावे लागते, ज्यामुळे रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा गोळे येणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
काही महत्त्वाच्या सूचना
- डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही आयुर्वेदिक किंवा हर्बल औषध सुरू करू नका.
- प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्स स्वतःहून घेऊ नका.
- प्रत्येक डायलिसिस सत्र नियमित पूर्ण करा.
- नियमित रक्ततपासण्या करून घ्या.
- आहाराबाबत शंका असल्यास नेफ्रॉलॉजिस्ट किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र. डायलिसिस सुरू झाल्यावर फळे पूर्णपणे बंद करावी लागतात का?
नाही. कोणती फळे आणि किती प्रमाणात खायची हे रक्तातील पोटॅशियमच्या पातळीवर अवलंबून असते.

प्र. डायलिसिसच्या रुग्णांनी दूध पिऊ शकतात का?
होय, पण प्रमाण मर्यादित ठेवावे लागते. प्रत्येक रुग्णासाठी योग्य प्रमाण वेगळे असू शकते.
प्र. मला खूप तहान लागते. काय करावे?
तोंड धुणे, बर्फाचा छोटा तुकडा चोखणे, साखरमुक्त च्युइंग गम चघळणे किंवा लिंबाचा छोटा तुकडा चोखणे यामुळे तहान काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
---
सूचना: हा लेख सर्वसाधारण आरोग्य शिक्षणासाठी आहे. प्रत्येक रुग्णाचा आहार त्याच्या वैद्यकीय स्थितीनुसार बदलू शकतो. आपल्या नेफ्रॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसारच आहारात बदल करा.
.jpg)



Comments